गोडोली : बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेला आहे.निरोगी राखण्यासाठी फळांचा आहार उत्तम मानला जात असला तरी हा आहारही आता अनेक आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. अल्पावधीतच भरपूर कमाई करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अनेक अपप्रवृत्ती फळांच्या व्यवसायात तयार झाल्या आहेत. घातक रसायनांचा वापर करून अत्यंत कमी वेळात पिकवलेली फळे बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत.
या प्रवृत्तींना आळा घालणारी अन्न औषध प्रशासन नावाची यंत्रणा मात्र पुरती सुस्तावल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक फळ पिकविण्याच्या पद्धतीला फाटा देऊन फळे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा सर्रास वापर केला जात आहे. आंबा, केळी, चिकू, टरबूज, खरबूज, सफरचंद, डाळिंब, केळी यासारखी फळे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर होत आहे.
फळे पिकवण्याच्या नैसर्गिक पद्धतीत चार ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ लागत असल्याने झटपट पद्धती स्वीकारली जात आहे. यामध्ये कॅल्शिअम कार्बाइड व इथिलिन सोल्युशन या घातक रसायनांचा वापर करून काही तासांतच फळे पिकवली जात आहेत. रसायनांच्या साह्याने पिकवलेल्या या फळांच्यामुळे ग्राहकांना अनेक गंभीर आजार निर्माण होत आहेत.