सातारा : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला.कॉँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येत सोमवारी सकाळी सातारा शहरात रॅली काढली. गांधी मैदानापासून पोवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी आवाहन करण्याआधीच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. कॉँग्रेस -राष्ट्रवादीतर्फे आयोजित केलेली रॅली पोवई
नाक्यावर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संपविण्यात आली.रॅलीत राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, राजेंद्र लवंगारे, शफीक शेख, नाना इंदलकर, राजू गोरे,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. रवींद्र भारती (झुटिंग), रजनी पवार, जिल्हाध्यक्षा धनश्री महाडीक, अन्वर पाशाखान, तालुकाध्यक्ष नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम, डॉ.अजय साठे, सादिक खान, अमर करंजे, मोहसीन बागवान, विक्रांत चव्हाण, गौरव इमडे, संतोष सावंत, किशोर रावखंडे आदी उपस्थित होते. या रॅलीमध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.बसस्थानक परिसरात सकाळी प्रवाशांची रेलचेल सुरु होती. आंदोलनाचा अंदाज घेतच बसची वाहतूक सुरु होती. नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या बसच्या वाहकांनी प्रवाशांची पुण्यापर्यंत तिकिट बुकिंग केले. तिथून पुढे परिस्थिती पाहूनबस नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.
दरम्यान, कम्युनिस्ट पक्षानेही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने केली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. रिक्षा, स्कूल बस बंद राहिल्याने विद्यार्थ्यांनी अघोषित सुटी घेतली. बंदमुळे पालकांनीही मुलांना शाळेत पाठविणे टाळले.
शहरात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी सकाळच्या वेळेत दुकाने बंद ठेवली होती; परंतु शहरात दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरातील रस्त्यांवर वाहनांचीही रेलचेल सुरुच होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस खबरदारी घेत होते.