साताऱ्यातील अनेक व्यापारी, खासगी क्लास चालकांनी पालिकेची कसलीही परवानगी न घेता झाडे, विद्युत खांबांवर जाहिराती केल्या आहेत. याविरोधात पालिकेने मोहीम तीव्र केली असून त्या हटविण्यास सुरुवात केली आहे. (छाया : जावेद खान)
०००००
निर्भया पथकाची नजर
सातारा : साताऱ्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थिनी येत आहेत. सडकसख्याहरींचा त्यांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी निर्भया पथकाची त्यांवर करडी नजर आहे. संबंधितांवर कारवाई केली जात आहे.
०००००००
कास परिसरात पाऊस
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळी अर्धा ते पाऊण तास अत्यल्प तुरळक स्वरूपात पाऊस झाला. तसेच बहुतांशी ठिकाणी गवत कापणीची कामे पूर्ण होऊन गवत बांधायचे काम सुरू आहे. दरम्यान, बांधून ठेवलेले गवत आज झालेल्या पावसाने भिजले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली.
------------
छत्र्यांच्या दुरुस्तीला वेग
सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचा शिडकावा होत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यामुळे जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यासाठी आणल्या जात आहेत, तर काहीजण रेनकोट अन् स्वेटर दोन्ही घेऊन बाहेर पडत आहेत.
००००००
रात्री कचरा रस्त्यावर
सातारा : साताऱ्यातील सदरबझार परिसरातील रस्त्यावर नागरिक रात्रीच्या वेळी कचरा आणून टाकत असतात. त्यातच सध्या दिवसभर ढगाळ वातावरण असून ऊन पडत नाही. पावसाच्या सरी कोसळल्याने कचरा कुजून दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
०००००००
भारनियमनाला सुटी
सातारा : साताऱ्यात अनेक भागात वीज विभागातर्फे दुरुस्तीची कामे करण्यासाठी दर मंगळवारी भारनियमन केले जात होते. पण गेल्या काही महिन्यांपासून भारनियमनाला सुटी दिली जात आहे. एखादा तास वीज बंद करून ही कामे केली जात आहेत. त्यामुळे दिलासा मिळत आहे.
००००००
आजारी वृद्धा जिल्हा रुग्णालयात दाखल
सातारा : साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून एक वृद्धा वावरत होती. ती दोन दिवसांपासून आजारी होती. हे लक्षात आल्यावर भारत विकास ग्रुपच्या सदस्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
०००००
बाजारपेठ फुलली
सातारा : मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला घरोघरी व्रतवैकल्ये करत असतात. त्यासाठी विविध पाच फळे पूजेसाठी ठेवली जातात. त्यामुळे साताऱ्याची बाजारपेठ फुलली आहे. बाजारपेठ चांगलीच फुलली असून फुलेही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आली आहेत. फुले खरेदीसाठी गर्दी होत आहे.
०००००००
प्रचार यंत्रणा शिगेला
सातारा : सातारा जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. काहीही करून ग्रामपंचायत ताब्यात राहावी, यासाठी राजकीय पॅनेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या ताकदीने कामाला लागले आहेत. घरोघरी जाऊन ते प्रचार करत आहेत. त्यांच्यामध्ये उत्साह वाढल्याचे जाणवत आहे.