सातारा : बँकेत नोकरीचे आमिष दाखवून खटाव तालुक्यातील एका तरुणाला गंडा घातल्यानंतर सोमवारी आंबळे, ता. सातारा येथील आणखी एका युवकाची ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुजय नंदकुमार जोशी (वय २४, रा. सदरबझार, सातारा, मूळ औरंगाबाद) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, पुसेगाव येथील धैर्यशील फडतरे या तरुणाला बँकेत क्लार्कची नोकरी लावतो, असे सांगून ७८ हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सुजयला अटक केल्यानंतर त्याने अनेकांना नोकरी, शासनाचे अनुदान आणि सरकारी कामात मदत करण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याने तपासात निष्पन्न झाले.सुजयने सातारा तालुक्यातील आंबळे येथील सनी विजय पिपळे (वय २२) याचा विश्वास संपादन करून बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९३ हाजर रुपये घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार कुमठेकर करीत आहेत.