अंगापूर : रहिमतपूर-अंगापूर गावाला जोडणारा ब्रह्मपुरी येथील कृष्णा नदीवरील भल्या मोठ्या पुलावरून रात्रंदिवस वाळूच्या डंपरची वाहतूक सुरू आहे. डंपरच्या शेकडो फेऱ्यांमुळे ब्रह्मपुरीतील पुलाचा दोन्ही बाजूंचा भराव खचू लागला आहे.उद्घाटनापूर्वीच नव्या पुलाला धोका निर्माण झाल्याने अंगापूर ग्रामस्थांमतून संताप व्यक्त केला जात आहे.अंगापूर व रहिमतपूर येथिल लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून ब्रह्मपुरी येथील कृष्णा नदीवर पुलाची उभारणी केली. या पुलामुळे माणदेश ते कोकण, व्हाया नॅशनल हायवे नंबर चार असा प्रवास जवळचा होणार आहे. तसेच अंगापूर ते रहिमतपूर या दरम्यानचा दळणवळणास चांगल्या पद्धतीने चालना मिळाली.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतर पुलाची यशस्वीपणे उभारणी झाली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या पुलाचा वापर चुकीच्या पद्धतीने आणि धोकादायकरीत्या सुरू आहे. राजरोसपणे रात्रंदिवस या पुलावरून वाळूच्या डंपरची ये-जा सुरू असते. वाळूची ओव्हरलोड वाहने या पुलावरून जाताना पुलाचा थरकाप होत आहे.
वाळूची वाहतूक सुरू असताना पुलावर उभे राहिली असता वाळूच्या वजनदार वाहनाने पुलाचा थरकाप होत असल्याचे नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडत आहे. पूर्व-पश्चिम असा उभारलेला पुलाच्या अंगापूरच्या दिशेला दक्षिण बाजूस पुलाला टाकलेला भराव खचू लागला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम उघडे पडू लागले आहे.पुलाच्या आजूबाजूला जवळपास वाळूचा उपसा झाल्यास पुलाला निर्माण झालेला धोक्यात आणखी वाढ होणार आहे. सातारा-कोरेगाव तालुक्याला जोडणाऱ्या या टोलेजंग पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अंगापूर ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.