पोलादपूर/सातारा: महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ६०० फूट खोल कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दैव बलवत्तर म्हणूनच या बसमधील प्रकाश सावंत-देसाई बचावले आहेत. त्यांनी सांगितलेलं अपघाताचं कारण अधिकच अस्वस्थ करणारं आहे. ड्रायव्हरनं केवळ क्षणभरासाठी मागे पाहिलं आणि कुणाला काही कळायच्या आत बस दरीत गेली, होत्याचं नव्हतं झालं.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दरवर्षी लावणी वगैरे झाल्यानंतर पिकनिकला जातात. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ड्रायव्हरसह ३४ जण वर्षासहलीला निघाले होते. दोन दिवस धम्माल करण्यासाठी सगळेच उत्सुक होते. त्यांनी ग्रूप फोटो काढला आणि बस महाबळेश्वरच्या दिशेनं रवाना झाली. परंतु, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं.
बसमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. चेष्टा-मस्करी करत करत प्रवास सुरू होता. तेव्हा, बस चालकाने सहज मागे बघितलं आणि बस रस्ता सोडून मातीवर गेली. त्यावेळी ड्रायव्हरने ब्रेक लावले, पण मातीवरून घसरत जाऊन बस दरीत कोसळली, असं प्रकाश यांनी सांगितलं.
(Inputs: वार्ताहर प्रकाश कदम)
असे बचावले प्रकाश सावंत-देसाई
प्रकाश सावंत-देसाई हे कृषी विद्यापीठात साहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बस दरीत जात असताना प्रकाश दारातून बाहेर फेकले गेले. झाडाच्या आधाराने ते बचावले आणि नंतर फांद्यांना धरूनच साधारण अर्ध्या तासात रस्त्यावर पोहोचले. घाटातील वाहनांना अडवून त्यांनी अपघाताची माहिती दिली आणि कृषी विद्यापीठातील वरिष्ठांनाही घडलेली घटना सांगितली. त्यानंतर वेगाने सूत्रं हलली आणि स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकं वेगानं घटनास्थळी पोहोचली.