सातारा : सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याविरोधात भाजपाच्या नगरसेविकेने तक्रार दाखल केली. यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या 2 नोव्हेंबर 2017 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन आरोग्य सभापती वसंत लेवे व विरोधी पक्षनेते अशोक मोने यांच्यात धक्काबुक्की झाली होती.
सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये भांडणे सुरू असताना नगराध्यक्षा माधवी कदम यांनी राष्ट्रगीत सुरू करण्याच्या सूचना कर्मचा-यांना दिल्या होत्या. त्यानंतर अशोक मोने यांनी वसंत लेवे यांच्यावर तर वसंत लेवे यांनी अशोक मोनेंवर राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या निवेदनाद्वारे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी मंगळवारी(16 जानेवारी) दुपारी नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल केला.