सातारा ,दि. १ : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. डेंग्यूची लागण आटोक्यात येण्यासाठी आरोग्य विभागाने विविध ठिकाणी बारा पथके तैनात केली आहेत. येत्या काही दिवसांत डेंग्यूचे रुग्ण कमी होतील, असा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
खेड ग्रामपंचायती परिसरात डेंग्यूचे आठ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आरोग्य विगाने याची तत्काळ दखल घेऊन डेंग्यूचे रुग्ण कमी होण्यास प्रयत्न केले. सध्या तीन रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खेड परिसरात आरोग्य विभाग लक्ष ठेवून असतानाच आता सातारा शहरातील लक्ष्मीटेकडी, संभाजीनगर या परिसरातही डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पाचजणांना डेंग्यूची लागण झाली असून, दोघांवर शासकीय रुग्णालयात तर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. डेंग्यू निवारण्यासाठी आरोग्य विभागाने बारा पथके तैनात केली आहेत. या पथकामध्ये प्रत्येकी आठजण असणार आहेत.
पथकाच्या माध्यमातून संबंधित परिसराची सखोल माहिती घेतली जाणार आहे. पाणी पुरवठा, गटार स्वच्छ करणे, औषध फवारणी करणे, डेंग्यू सदश्य रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणे, त्याचा अहवाल तत्काळ मागविणे यासह अन्य कामे हे पथक करणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा शल्चचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई हे पथकाकडून वेळोवेळी माहिती घेणार आहेत. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ज्या ठिकाणाहून होत आहे, तेथे औषध फवारणी मारून डेंग्यूचे रुग्ण मारले जात आहेत, अशी माहिती डॉ. श्रीकांत भोई यांनी दिली.