पारा २६ अंशांवर
सातारा : राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील जावळी, महाबळेश्वर व पाटण तालुक्यातही अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. पावसामुळे तापमानही सातत्याने खालावू लागले आहे. मंगळवारी साताऱ्याचे कमाल तापमान २६.४, तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. महाबळेश्वरचा पाराही मंगळवारी १७.५ अंशांवर स्थिरावला. वातावरणातील बदल झाल्याने सर्वत्र थंडीची तीव्रता वाढली आहे.
भाजी विक्रेत्यांचे
स्थलांतरण करावे
सातारा : शहरातील तहसील कार्यालय ते बससस्थानक या मार्गावर दररोज सकाळी रस्त्यावरच भाजी मंडई भरते. रहदारीचा हा प्रमुुख मार्ग असल्याने वाहनांची या मार्गावरून सतत ये-जा सुरू असते. हा धोका पत्करून भाजी विक्रेते रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसतात. या मार्गावर एखादी विपरित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, संबंधित विक्रेत्यांचे पालिकेने इतरत्र स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत गर्दी
वाई : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाईतील बाजारपेठ अक्षरश: गजबजून गेली आहे. मुख्य बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी शहरात खरेदीसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. शोभेच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, तयार मखर, विजेच्या रंगीबेरंगी माळांनी बाजारपेठेला झळाळी आली आहे. या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याने व्यापारी व दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.