सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सोमवारी हवामान विभागाने सातारा शहराचे कमाल तापमान २७ तर किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. पावसामुळे हवेत गारव्याचे प्रमाण वाढले असून, उबदार कपड्यांना मागणी वाढू लागली आहे.
माची पेठेतील गटारे तुुडुंब
सातारा : शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अजिंक्यतारा किल्ल्यावरून मोठ्या प्रमाणात माती, खडी व कचरा वाहून आल्याने माची पेठ, केसरकर पेठ व शनिवार पेठेतील गटारे कचऱ्याने तुडुंब भरली आहेत. पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने गटारातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. या सांडपाण्यामुळे ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली असून, पालिकेने गटारांची तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे
डुकरांचा उपद्रव; नागरिक हैराण
सातारा : साताऱ्यातील सदर बझार व लक्ष्मी टेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. झोपडपट्टी परिसर असल्याने सदर बझार येथे आरोग्याचा प्रश्न नेहमीच गंभीर बनलेला असतो. डेंग्यू, चिकुनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण याच भागात आढळून येतात. आता डुकरांचा उपद्रव वाढल्याने चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
सातारा : शहरातील बोगदा, समर्थ मंदिर चौक, राजवाडा, मंगळवार तळे व शाहूपुरी येथील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. पालिकेने काही रस्त्यांचे खडी व मुरून टाकून पॅचिंग केले होते; परंतु तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, वाहधारकांना या मार्गावरून ये-जा करताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.