पारा २८ अंशांवर
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली असून, तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान विभागाने रविवारी सातारा शहराचे कमाल तापमान २८.९, तर किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वातावरणात सतत बदल होत असून, सायंकाळनंतर हवेत गारव्याचे प्रमाण वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात पावसाच्या सरी अधूूनमधून बरसत आहेत. रविवारी येथील कमाल तापमान २१.२ तर किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
महाबळेश्वरचा
रस्ता खड्ड्यांत
पाचगणी : पाचगणी ते महाबळेश्वर या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांसह पर्यटकांना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी करणे अपेक्षित होते. मात्र, खड्डे न बुजविल्याने पावसाळ्यात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून वाहनधारकांची सुरू असलेली कसरत अजूनही थांबलेली नाही.