दत्ता यादवसातारा : गुन्हेगारीत सरावलेले चोरटे चोरीसाठी कोणती नामी शक्कल लढवतील याचा नेम नाही. अशाच एका अजब चोरट्याची गजब कहाणी समोर आलीय. तर हा चोरटा साधासुधा नसून तो साळसूदपणे साताऱ्यातील एका प्रसिद्ध हाॅस्पिटलमध्ये वाॅर्डबाॅय म्हणून काम करायचा; पण या पांढऱ्या कपड्याच्या आडून त्याचा चोरीचा गोरखधंदा मात्र बिनबोभाट सुरूच होता. या त्याच्या धंद्याचा सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या शाखेने मात्र पर्दाफाश केला.सातारा शहर आणि परिसरातून गेल्या काही दिवसांपासून दुचाकीचोरीचे प्रमाण अचानक वाढले. त्यामुळे पोलिसांनी यादीवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यास सुरुवात केली. पूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी सध्या काय करतायत, याची माहिती घेतली असता काही जण या चोरीच्या दलदलीतून बाहेर पडले असल्याचे पोलिसांना समजले. त्यातीलच एक अभिजित राजाराम लोहार (वय ३५, रा. आंबवडे बुद्रुक, ता. सातारा) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याची माहिती घेतली असता तो आता सुधारला असून, तो चोरी करत नाही, असं त्याच्या घरातल्यांनी पोलिसांना सांगितलं.पण अभिजित आता काय काम करतोय, असं पोलिसांनी विचारल्यानंतर घरातल्यांनी अभिजित साताऱ्यातील एका प्रसिद्ध हाॅस्पिटलमध्ये वाॅर्डबाॅय म्हणून काम करतोय, याची माहिती दिली. पण घरातल्यांवर विश्वास न ठेवता तो आता खरंच सुुधारला आहे का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर महिनाभर वाॅच ठेवल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. तो रुग्णालयात वाॅर्डबाॅय म्हणून काम करत असला तरी त्याने दुचाकी चोरीचा धंदा काही सोडला नव्हता. उलट घरातल्यांच्या आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच त्याने वाॅर्डबाॅयचं काम स्वीकारल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी हाॅस्पिटलमध्ये सलग तीन दिवस वाॅच ठेवला. मात्र, अभिजित कामावर आला नाही. चाैथ्या दिवशी तो कामावर येताच पोलिसांनी त्याला उचललं आणि थेट पोलीस ठाण्यात आणलं. त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्याने आपण चोरीचा धंदा काही सोडला नव्हता. गेल्या बारा वर्षांपासून दुचाकींची चोरी करतोय, असं त्यानं पोलिसांपुढे कबूल केलं. त्याच्याकडे चोरीच्या तीन दुचाकी सापडल्या. यात एका पोलिसाची गाडीही आहे. ८० हजारांची दुचाकी तो अवघ्या ५ ते १० हजारांत विकायचा. त्यातून मग तो स्वत:चे नशिले शाैक पुरवायचा.
हे गुन्ह्याची दुसरी बाजूही तपासतायत..सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणाची ही टीम केवळ गुन्हे उघड करत नाही तर त्या गुन्ह्याची दुसरी बाजू तपासून पाहते. कोणत्या कारणामुळे गुन्हेगारीत एखादा ओढला जातोय. तो परत मूळ प्रवाहात येण्यासाठी काय केले पाहिजे, या दृष्टीनेही ही टीम प्रयत्न करतेय. या टीममधील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाइक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, संतोष कचरे यांचे वरिष्ठांनी काैतुक केलंय.
चोरीचे क्षेत्र कऱ्हाड अन् सातारा-अभिजित लोहार याने चोरीचे क्षेत्र स्वत: ठरवून घेतले होते. कऱ्हाड आणि सातारा शहरातूनच तो दुचाकी चोरायचा.-आत्तापर्यंत त्याच्यावर तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत. यावरूनच तो किती सराईत आहे, याची प्रचिती येते.