सातारा : इंधन दर वाढीबरोबरच इन्शूरन्स आणि टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करण्यासाठी सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याला आला. यावेळी इंधन दरवाढ बंद करा.. टोलनाक्यावरील अनागोंदी बंद करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.येथील जिल्हा क्रीडा संकुल जवळून या मोर्चाला सुरूवात झाली. मुख्य बसस्थानकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी मार्गदर्शन केले.
गेल्या वर्षभरात डिझेलच्या दरात जवळजवळ दीडपट वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे वाहतूकदारांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. डिझेलच्या दरावर केंद्र आणि राज्य सरकार यांचे भरमसाट कर आहेत. हे कर त्वरीत कमी करण्यात यावेत. असे झाले नाही तर वाहतूक व्यवसाय अगोदरच अडचणीत आला आहे. अशा प्रकारामुळे तो नाश होण्याची शक्यता आहे, असे गवळी यांनी सांगितले.दरम्यान, यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी इंधन दरवाढ,टोलनाक्यावरील अनागोंदीबाबत चर्चा करण्यात आली. या मोर्चात संघटनेचे सचिव धनंजय कुलकर्णी यांच्यासह वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.टोल नाक्यावर क्रेन, रुग्णवाहिकेचा अभाव...आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्याच्या ठिकाणी शासनाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे कोणत्याही गोष्टीची पूर्तता संबंधितांकडून केली जात नाही. याउलट त्रास देऊन अधिक पैशांची मागणी केली जाते. टोल नाक्यावर क्रेन, रुग्णवाहिका उपलब्ध नसतात. अपघातानंतर कोणतीही मदत तातडीने मिळत नाही. वजन काट्याचा दुरूपयोग केला जातो, असा आरोपही यावेळी करण्यात आला.