सातारा , दि. १८ : बैलगाडी चालक-मालकांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पडलेला शेणाचा सडा अखेर तिसऱ्या दिवशी सकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाने काढला.
बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी बैलगाडी चालक-मालकांनी दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ चक्क बैलं दावणीला बांधली होती. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र वैरण आणि शेणाचा सडा पडला होता. हा सडा काढावा म्हणून नागरिक प्रशासनाकडे मागणी करत होते तर प्रशासनाचे अधिकारी पालिकेकडे बोट दाखवित होते.
मंगळवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणाचा सडा तसाच पडून होता. या शेणावरून दुचाकी घसरून अनेकजण पडलेही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये शेणाचा सडा तसाच राहतो की काय? असे सातारकरांना वाटत होते. त्यातच बुधवारी दिवाळीची पालिकेला सुटी असल्यामुळे आणखी एक दिवस नागरिकांना वाट पाहावी लागणार होती.
मात्र, सुटी असतानाही पालिकेच्या आरोग्य विभागाने सकाळ-सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील शेणाचा सडा काढला. परंतु अद्यापही त्या ठिकाणी वैरण विखुरली गेली आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. गुरुवारी पुन्हा स्वच्छता मोहीम राबविणार असल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यानी सांगितले.