सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला तहसीलदाराच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची पर्स व त्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली.याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता विजय तळेकर-धुमाळ (वय ४०, रा. सातारा) या दिवसभर त्यांच्या दालनात काम करीत होत्या. दरम्यान, सायंकाळी बैठकीच्या कामानिमित्त त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या.
दरम्यान, धुमाळ यांनी स्वत:ची पर्स टेबलावर ठेवून त्या बाहेर गेल्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली. यात दहा हजार रुपये, बँकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे होती.
बैठक संपवून त्या दालनात आल्या असता त्यांच्या टेबलावर पर्स नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. याबाबत रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहे.