पेट्री : पोषक वातावरण असल्याने कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले आहे. त्यामुळे देश-विदेशातील हजारो पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. शनिवार, रविवार या सलग सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला येत आहेत. शनिवारी देश-विदेशातील हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पार्किंगस्थळी वाहनेच वाहने दिसत होती.
नयनरम्य आणि सुंदर फुलांना पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांनी शनिवारी कास पठाराला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील रंगोत्सव अनुभवला. यावेळी पर्यटक फुलांसमवेत स्वत:ला कॅमेऱ्यात बंद करत सेल्फी तसेच फोटोसेशन मोठ्या प्रमाणावर करताना दिसत होते. सध्या जांभळ्या, लाल व पांढºया, पिवळ्या रंगाची छटा पर्यटकांना दिसत आहे. चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची अधूनमधून सर, गुलाबी थंडी, दाट धुके यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत पर्यटनाचा आनंद
लुटत आहेत. तसेच पार्किंगच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा पाहावयास मिळत आहे.कास पठारावर गेंद, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, अबोली मा, अभाळी, नभाळी, स्मितिया, मंजिरी, चवर, टुथ ब्रश, कापरू, पंद, भुईचक्र यासारख्या अनेक फुलांना चांगल्या प्रकारे बहर आला आहे. ठिकठिकाणी रंगीबेरंगी गालिचे पाहावयास मिळत आहेत.शुभ्र कमळे...कास पठारावरून महाबळेश्वरकडे जाणाºया राजमार्गावर तीन किलोमीटर अंतरावरील कुमुदिनी तलावात नायफांडिस इंडिका (कुमुदिनी) नावाची कमळे फुलण्यास सुरुवात झाली आहेत. काही दिवसांतच तलाव फुलांनी बहरलेला पाहावयास मिळणार आहे. तलावात मोजता येणार नाही एवढी पांढरी शुभ्र कमळे फुलणे, हे येथील खास वैशिष्ट्य आहे.
दरवर्षी कास पठारावर फुले पाहण्यासाठी येत असतो. पर्यटकांच्या सोयीसुविधेसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, निवारा शेड तसेच ठिकठिकाणी नो पार्किंग झोन, नो सेल्फी झोन अशा प्रकारे बोर्ड लावले आहेत. अशाप्रकारे नियोजन झाल्याने चांगल्या प्रकारे पर्यटनाचा आनंद घेता येत आहे.- राजू कोळेकर, बारामती पर्यटक