सातारा : शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेचा भर असून, विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयाच्यामागे रिसालदार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार असून, विसर्जन मिरवणूक राजवाड्यावरून सुरू न होता आता ती पालिका कार्यालयापासून होणार आहे, असे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.गणेशोत्सवा तयारीच्या अनुषंगाने पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात गणेशोत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पोलीस उपअधीक्षक ....राजमाने, साविआच्या पक्षप्रतोद स्मिता घोडके, विरोधी पक्षनेते अशोक मोने, सभापती मनोज शेंडे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सविता फाळके, स्नेहा नलवडे, लता पवार, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांची उपस्थिती होती.गणेश विसर्जनाचा प्रश्न पालिकेने निकाली काढला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीनंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी रिसालदार तलाव गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून दिला. या निर्णयामुळे विसर्जनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.
विसर्जन मिरवणुका राजवाडा येथून सुरू होत होत्या. आता त्या नगरपालिका कार्यालयासमोरून सुरू होतील, असे स्पष्टीकरण पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने बक्षीस योजना जाहीर करावी, प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्ती तुलनेने महाग पडतात, त्यामुळे पालिकेने काही अनुदान स्वरुपात नागरिकांना मदत करावी, निर्माल्याच्या माध्यमातून चांगली खतनिर्मिती होऊ शकते, त्यामुळे पालिकेने निर्माल्य गोळा करण्याची उपाययोजना करावी, अशा काही सूचनाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्या.
गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा सातारा शहराला आहे. पालिकेचे पूर्ण सहकार्य मंडळांना राहणार आहे. अनेकदा मंडळांच्या शेजारी ट्रॅफिक जामची समस्या होत असते. ती होऊ नये, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पोलीस प्रशासनानेच त्यांच्यावर कोंडी सोडविण्याची जबाबदारी द्यावी.- स्मिता घोडके
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वांनीच पालिकेला सहकार्य करावे. गणेशमूर्तींची उंची कमी ठेवली तर अनेक समस्या दूर होतील. मिरवणूकही सुरळीत पार पडेल.- वसंत लेवे
मूर्ती विसर्जनानंतर तळी स्वच्छता मोहीम पालिकेने तत्काळ राबवावी. यासाठी सार्वजनिक मंडळे आपल्या वर्गणीतील काही रक्कम पालिकेला देतील. मात्र वर्षानुवर्षे तळी साफ झाली नाही तर आजूबाजूला राहणाऱ्यांना त्याचा त्रास होतो.- श्रीनिवास जाधव
अतिक्रमण करणाऱ्यांमुळे गणेशोत्सवात मोठा त्रास सोसावा लागणार आहे. फूटपाथवर खोकी टाकली जात असल्याने लोकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ही अतिक्रमणे गणेशोत्सवाआधी काढावीत.- जितेंद्र वाडकर
शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाला हवी पर्यायी जागाग्रेड सेपरेटरच्या कामामुळे पोवईनाक्यावर रस्ता फोडण्यात आला आहे. येथे शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उत्सव साजरा केला जातो. यंदा मात्र जागेअभावी उत्सव साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह असून, ७५ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या या मंडळाला उत्सव साजरा करण्यासाठी जागा उपलब्ध करावी, तसेच रविवार पेठेतून पोवई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरही आणखी तीन मंडळे उत्सव साजरा करातात, त्यांचीही सोय करावी, अशी मागणी नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी केली.गणेशोत्सव बैठकीला अनेक नगरसेवकांची दांडीगणेशोत्सव बैठक ही संपूर्ण शहराच्या दृष्टिने महत्त्वाची असते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने गणेशोत्सव मंडळे काही महत्त्वाचे निर्णय घेत असतात. या बैठकीला नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र मोजकेच नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.