- नितीन काळेल सातारा - राज्य विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांत होत असून, आघाडीतील काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातीलही अनेकजण दंड थोपटण्यास तयार झालेत. आघाडीत जागावाटप नसतानाच काँग्रेसची ही तयारी पक्षासाठी उभारी देण्यासारखी ठरू शकते.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी तसेच महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटांचे जागावाटप झाले नसले तरी प्रमुख पक्ष आपापल्या पातळीवर रणनीती आखत आहेत. आता राष्ट्रीय काँग्रेसने निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरण्याचा विडाच उचलला आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातही इच्छुकांना ३० जुलैपूर्वी उमेदवारी मागणीचे अर्ज सादर करावे लागणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बळ मिळाले आहे. सर्वाधिक खासदार निवडून आलेत. त्यामुळे काँग्रेसने दोन महिने आधीच विधानसभेची तयारी केली आहे. सातारा जिल्ह्यातही विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे तीन (शरद पवार गट एक आणि अजित पवार गट दोन), शिंदेसेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन तसेच काँग्रेसचा एक आमदार आहे. आताच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस ताकदीने उतरण्याच्या प्रयत्नात आहे.
माण मतदारसंघातून रणजितसिंह देशमुख इच्छुक असणार आहेत. आंदोलन, बैठकांमधून त्यांनी तयारी केल्याचे दिसून येत आहे. मात्र, हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा पूर्ण होणार का, याविषयी दोन महिने वाट पाहावी लागेल. कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक तालुकाध्यक्ष ॲड. श्रीकांत चव्हाण लढवू शकतात. पण, हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. आमदार शशिकांत शिंदे हे पुन्हा दंड थोपटणार आहेत. त्यामुळे ॲड. चव्हाण यांनी इच्छा दाखविली तरी मतदारसंघ काँग्रेसला मिळेल का, याबाबत साशंकता आहे. वाई मतदारसंघात युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. पण, हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे शिंदे काय करणार, याकडे लक्ष असेल.
पाटण मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. पण, याठिकाणी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई दंड थोपटण्याच्या विचारात आहेत. यासाठी संपर्कही वाढवलाय. पण, राष्ट्रवादी हा मतदारसंघ सोडणार का, यावर देसाईंची वाटचाल अवलंबून राहील. सातारा विधानसभा मतदारसंघात आघाडीची ताकद कमी आहे. तरीही सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण हे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. आघाडीत राष्ट्रवादीकडे मतदारसंघ असल्याने काँग्रेसला मिळणे अशक्य दिसते. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात इच्छुक असल्याचे दिसते. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे करतात. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे. तिसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीत उतरणार का, हेच आता पाहावे लागणार आहे. फलटण मतदारसंघाबाबत अजून कोणी इच्छुक समोर येताना दिसून येत नाही.