सातारा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर येथील अजंठा चौकात कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोनजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुण्याहून कोल्हापूरकडे कंटेनर निघाला होता. त्यापाठोपाठ टेम्पोही कोल्हापूरकडेच निघाला होता. अजंठा चौकात आल्यानंतर कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो कंटेनरवर जोरदार आदळला. यामध्ये टेम्पोमधील दोनजण जखमी झाले. या अपघातामध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे मारहाणीच्या भीतीने कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. महामार्गाच्या मधोमध हा अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती. शहर पोलिसांनी काही वेळांतच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली. जखमींची नावे पोलिसांना समजू शकली नाहीत.