सातारा : सुनेबरोबरच तिच्या माहेरहून आलेल्या गायीचे डोहाळ जेवण करून आनंद साजरा करण्याचा अनोखा प्रकार खातगुण येथील लावंड कुटुंबीयांनी केला. सध्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा या परिसरात आहे.गायीचं महत्त्व विविध स्तरातून अधोरेखित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. खातगुण येथील धनाजी आणि रुक्मिणी लावंड यांची स्नुषा स्नेहल हिचे माहेर मायणी. गतवर्षी लग्न झाले तेव्हा माहेरहून मुलीबरोबर गायही देण्यात आली.
सुनेच्या माहेरहून आलेली ही गाय लावंड कुटुंबीयांनी सुनेप्रमाणेच जपली. विशेष म्हणजे या दोघींचीही गोड बातमी एकाच वेळेला कुटुंबीयांना समजली. सुनेबरोबरच आपल्या या गायीवर असलेले प्रेम सिद्ध करत लावंड कुटुंबीयांनी चक्क दोघींचेही डोहाळ जेवण केले.या कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांनाही आमंत्रित करण्यात आले होते. सर्व सुवासिनींनी या दोघींचीही ओटी भरली. सुनेच्या हातात आणि गायीच्या पाठीवर साडी टाकून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.