सातारा : येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ३ कोटी ३० लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरून संस्थेचे चेअरमन अॅड. मुकुंद सारडा यांच्यासह १२ संचालकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.अॅड. मुकुंद सारडा, सुभाष लोया, शिरीष पालकर, सुनील राठी, राहुल गुगळे, रवींद्र जाजू, नीलेश लाहोटी, धीरज कासट, सुरेश सारडा, सुरेश भस्मे, राजेश्री लाहोटी, पद्मा कासट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत लेखापरीक्षक राणी घायताडे (रा. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन आणि संचालकांनी आपापसांत संगनमत करून ३ कोटी ३० लाख ३७ हजार ८१ रुपयांचा अपहार केला.
या अपहारातील रकमेच्या वसुलीबाबत जाणूनबुजून टाळाटाळ करून हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केला. तसेच आपापसात हितसंबंध प्रस्थापित करून अपहार दडपण्याच्या उद्देशाने सभासद, ठेवीदार, सहकार खाते तसेच शासनाची फसवणूक करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एम. फरास हे करीत आहेत.