सातारा : शाळेच्या मुख्याध्यापकाला शासकीय विश्रामगृहात डांबून मारहाण करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी सुनील कोळेकर, संदीप मेळाट व शिवसेनेचे हरिदास जगदाळे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, अमोल एकनाथ कोळेकर हे साताऱ्यात एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना भाजपचे शहराध्यक्ष सुनील कोळेकर, उपाध्यक्ष संदीप मेळाट, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे व एका अनोळख व्यक्तीने शासकीय विश्रामगृहातील खोली नं. १ मध्ये बोलावले. त्या खोलीच्या दरवाजाची आतून कडी लावून लाथाबुक्क्या व चपलाने मारहाण केली.
दरम्यान, महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार देत, शाळा व घरी महिलांचा मोर्चा काढण्यात येईल. त्याचबरोबर तुला गोळ््या घालून ठार मारीन, अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.