सातारा : ड्युप्लेक्स फ्लॅट विक्रीचे पैसे घेऊन तो मालकी हक्काने करू न देता फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अतुल विजयचंद्र्र शहा (रा. कोडोली, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रभाकर घार्गे यांचा कोडोली एमआयडीसीतील श्रीनगर कॉलनीत ड्युफ्लेक्स फ्लॅट भाडेपट्टीवर होता. घार्गे यांनी २००५ मध्ये शहा यांना भेटून पैशाची गरज असून, डुप्लेक्स फ्लॅट विकायचा असल्याचे सांगितले.शहा यांनी तो खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर हिमा अतुल शहा व हर्षद जेठालाल शहा यांच्या नावे विक्री करार लिहून देऊन त्यांच्या बदल्यात घार्गे यांनी २ लाख १० हजार रुपये घेतले.
शहा हे काही दिवसांनी व्यवहार ठरल्याप्रमाणे उरलेले १ लाख ३० हजार रुपये देऊन फ्लॅट मालकी हक्काने करून घेण्यासाठी गेले. त्यावेळी घार्गे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तुम्ही बाहेर व्हा. फ्लॅट तुमच्या मालकीवर करून देणार नाही, मी आमदार आहे, माझं कोणी काहीही करू शकणार नाही, अशी धमकी दिली.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रभाकर देवबा घार्गे व इंदिरा प्रभाकर घार्गे (दोघे. रा अजिंक्य कॉलनी, सदरबझार, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.