सातारा : गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्या खुनाचे गूढ उलगडले आहे. हा खून पोलिस असलेल्या त्यांच्या पत्नीने सुपारी देऊन घडवून आणला असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. या खून प्रकरणात महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह सात जणांचा समावेश आहे.अभिषेक विलास चतुर (वय २७, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव, जि. सातारा), शुभम हिंदूराव चतुर (२७, रा. कोरेगाव, सध्या पुणे), राजू भीमराव पवार (२६, रा. १० पंताचा गोट, ता. जि. सातारा), सचिन रमेश चव्हाण (२२, रा. मुळशी, पुणे), सूरज ज्ञानेश्वर कदम (२७, खेड, ता. जि. सातारा, सध्या पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या पाच जणांमध्ये आणखी एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.वाढे फाट्यावरील एका हॉटेलमध्ये २४ जानेवारी रोजी रात्री पावणे बारा वाजता अमित भोसले हे त्यांच्या मैत्रिणीसोबत जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यातूनही ते बचावल्याने अखेर त्यांचा गळा कापून खून करण्यात आला होता. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाच पथके स्थापन केली होती. यातील काही पथकांना आरोपी हे गोव्यामध्ये असल्याचे समजले होते. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना साताऱ्यातील आरोपींची माहिती दिली. रविवारी सकाळी गोवा पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली.त्यानंतर त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर या सर्वांनी अमित भोसले यांची पोलिस दलात असलेल्या पत्नीने त्यांना मारण्यासाठी सुपारी दिली असल्याची कबुली दिली.पोलिसांनी अमित भोसले यांची पत्नी शुभांगी भोसले हिलासुद्धा अटक केली. तिने किती रुपयांची सुपारी दिली हे मात्र अद्याप समोर आले नसून पोलिस तिच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. सुपारी घेऊन खून करणारी टोळी ही सराईत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्यातील दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
Satara Crime: अमित भोसलेच्या हत्येचे गूढ उलगडले, पोलिस पत्नीनेच दिली होती खूनाची सुपारी
By दत्ता यादव | Published: February 04, 2023 5:17 PM