वडगाव हवेली : शेतीला पाणी देण्याकरिता वीज मिळावी म्हणून ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्यूज घालायला गेलेल्या शेतकरी युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. दिगंबर सुरेश जगताप (वय २६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव हवेलीतील मोजीम नावच्या शिवारात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. सोमवारी सकाळी दिगंबर जगताप याच्यासह अन्य काही शेतकरी कामानिमित्त शिवारात गेले होते. दिगंबरसह अन्य एका शेतकऱ्याला त्यांच्या ऊस शेतीला पाणी लावायचे होते. तर अन्य एका शेतकऱ्याला औषध फवारणी करायची होती.
त्यासाठी ते बोअरिंगचा वीज पंप सुरू करायला गेले. मात्र, वीज पुरवठा खंडित झाला होता. शिवारातच असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्यूजबॉक्समधील फ्यूज गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे दिगंबरने वायरमनला फोन केला. अन्य शेतकऱ्यांनीही वारंवार वायरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वायरमनशी संपर्क झाला नाही. त्यामुळे दिगंबरसह अन्य दोघेजण फ्यूजबॉक्सकडे गेले.
वीज पुरवठा सुरू होण्यासाठी दिगंबरने स्वत:च फ्यूज घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, शॉक लागल्याने तो कोसळला. शेतकऱ्यांनी त्याला उपचारार्थ तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले.फ्यूजबॉक्समध्ये फक्त तारादिगंबरने ज्या ट्रान्सफॉर्मरच्या फ्यूजबॉक्समध्ये फ्यूज घालण्याचा प्रयत्न केला त्याठिकाणी फ्यूजऐवजी फक्त तारा वापरण्यात आल्या आहेत. पकडीने तार बसविण्याच्या प्रयत्नात दिगंबरला शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. वीज कंपनीच्या या कारभाराविरोधात ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.