सातारा : दरवर्षी तीन-चार महिने पाण्याची टंचाई. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यात आलो आहे. येथील काम व उपलब्ध पाणी पाहून आमच्या गावातील दुष्काळ हटविण्याचा निश्चय केला आहे, हे शब्द आहेत, सांगोला तालुक्यातील ग्रामस्थांचे. दरम्यान, कारखेलमध्ये आलेल्या या पाहुण्यांची बैलगाडीत बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.माण तालुक्यातील कारखेल येथे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामधील सहा गावांचे वॉटर कप स्पर्धेअंतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या मान्यवरांनी कारखेल गावाने वॉटर कप स्पर्धेत केलेले काम पाहिले.
या गावातील पाणी उपलब्धता पाहून या पाहुण्यांनाही हुरुप आला आहे. त्यामुळे त्यांनी कारखेलचे कौतुक करतानाच आपल्या गावात काय-काय कामे करता येतील याचाही अभ्यास केला. कारखेलप्रमाणेच आपापल्या गावात कामे करण्याचा त्यांनी जणू ध्यासच घेतला आहे.