सातारा : परतीचा पाऊस झाला नसल्याने पूर्व भागात पाण्याची उपलब्धता नाही. जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात यंदा घट होणार आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात अवघी ११.५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विशेषत: करून माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पेरणीचे खरे संकट निर्माण झाले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम घेण्यात येतो. तर साधारणपणे आॅक्टोबर महिन्यापासून पेरणी होते. चांगला पाऊस झाला तरच शेतकऱ्याना उत्पादन मिळते; पण अनेकवेळा पावसाअभावी पेरण्या करूनही हाती फारसे उत्पन्न येत नाही. सध्या अशीच स्थिती जिल्ह्यातील सहा तालुक्यांत निर्माण झाली आहे.
त्यामध्ये माण, खटावला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना शेतीसाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच जमिनीत ओल नसल्याने पेरणी करून काय फायदा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठ फिरवली आहे. तर यापुढे पाऊस पडणार नसल्याने चारा नाही, जनावरे कशी जगवावीत, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.