सातारा : अनेकदा आपली मागणी नेमकी कोणत्या शासकीय विभागाकडे पूर्ण होईल, हे अनेकांना माहितीही नसते. त्यामुळे अशा लोकांची मग साहजिकच फसगत होते. असाच काहीसा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर घडला.
जादा वीज बिल आल्याने एका वृद्ध ग्रहस्थाने चक्क झेडपीसमोर ठिय्या मांडला. मात्र, बऱ्याचवेळानंतर त्यांच्या चूक लक्षात आली. वीज वितरणच्या कार्यालयासमोर त्यांना आंदोलन करायचे होते. मात्र, चुकून ते झेडपीसमोर आंदोलनाला बसले.सीताराम सदाशीव मोरे (वय ६२, रा. कृष्णानगर सातारा) यांनी बुधवारी दुपारी अचानक येऊन झेडपीच्या दारात ठिय्या मांडला. त्यांची नेमकी मागणी काय आहे, हे कोणालाही माहिती नव्हते. तेथून ये-जा करणारे त्यांच्याकडे पाहत झेडपीमध्ये निघून जात होते.
सुमारे अर्धा तास ते या ठिकाणी बसले होते. काही अधिकारी त्यांच्या भेटीलाही आले. त्यावेळी त्यांची मागणी पाहून झेडपीतील अधिकारीही अवाक झाले. त्यांना एका महिन्याचे १३५० रुपये वीज बिल आले होते. त्यामुळे राग-राग करत घरातून ते निघून आले.
वीज वितरणच्या कार्यालयासमोर जाण्याऐवजी त्यांनी झेडपीच्या दारातच ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले. तुम्ही वीज वितरणच्या कार्यालयात जावा, त्या ठिकाणी तुम्हाला वीज बिल कमी करून मिळेल.सीताराम मोरे यांना आपली चूक लक्षात आली. अधिकाऱ्यांकडे दिलगिरी व्यक्त करत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या नावे खडे फोडत मोरे यांनी वीज वितरणच्या कार्यालयाचा रस्ता धरला. मोरे यांच्या झालेल्या फसगतीची झेडपीमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.