सातारा : बेकायदा खासगी सावकारी करत पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची मागणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू नंदकुमार मोरे, तन्वीर शकूर शेख व गणेश मारुती निकम (रा. गोडोली, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रोहित सुरेश शेंडे (वय २८ रा. न्यू विकासनगर, सातारा) यांनी जून २०१५ मध्ये तन्वीर शेख याच्याकडून वाळू व्यवसायासाठी दहमहा २० टक्के व्याज दराने ५० हजार रुपये घेतले. त्याबदल्यात मोटारसायकल तारण ठेवली होती. त्यानंतर १२ दिवसांत मुद्दल, व्याज आणि दंडाची रक्कम अशी एकूण १ लाख रुपयांची परतफेड केली.
आॅक्टोबर २०१५ मध्ये राजू मोरे याच्याकडून १० टक्के व्याजाने ५ लाख रुपये घेतले. त्यापोटी मोरे व शेख यांनी ११ लाख ७० हजार रुपये जबरदस्तीने वसूल केले. त्यानंतर मार्च २०१६ रोजी रात्री आठ वाजता राजू मोरे, तन्वीर शेख व गणेश निकम यांनी घरात घुसून रोहित व त्याचे वडील सुरेश शेंडे यांना शिवीगाळ व मारहाण केली.
मोरे याने पिस्तुलाचा धाक दाखवून कुटुंबातील सर्वांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पोरे करीत आहेत.