सातारा : मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरातील जलवाहिनीची गळती काढण्यासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. याला आता आठ दिवस झाले तरी काम पूर्णत्वास गेलेले नाही. भररस्त्यातच हा खड्डा असल्याने अपघाताची भीतीही कायम आहे.सातारा शहरातील रस्त्याचे डांबरीकरण होत असताना पाठीमागे तो उकरणेही सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे डांबरीकरण काही महिनेच टिकते. परत पुन्हा पहिले दिवस येतात. परिणामी रस्त्यावर खड्डे तसेच राहतात.
अशाचप्रकारे येथील मंगळवार पेठेतील रस्त्याचे वर्षभरापूर्वी डांबरीकरण झाले. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे मुजले होते; पण चिपळूणकर बाग परिसरातील श्री दत्त मंदिराजवळ जलवाहिनीची गळती काढण्यासाठी आता रस्ता खोदण्यात आला आहे.
आठ दिवसांपासून हे काम सुरू असलेतरी पूर्ण झालेले नाही. येथे दोन ठिकाणी खड्डे आहेत. हे खड्डे रस्त्यावरच आहेत. त्यामुळे अपघाताची भीतीही व्यक्त होत आहे. तर अपघातासारख्या घटना टाळण्यासाठी बाजूने माती व झाडांचे डहाळे लावण्यात आले आहेत.
मात्र, रात्रीच्यावेळी पुढे खड्डा आहे हे अनोळखी वाहनचालकांना समजू शकणार नाही, अशीही स्थिती आहे. त्यामुळे जलवाहिनीची गळती काढण्यासाठी सुरू करण्यात आलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.