सातारा : जिल्ह्यात रविवारी आणखी १४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता ८१८ वर पोहोचला आहे. तर १४ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा जून महिन्याच्या अखेरीसही वाढत आहे. रविवारी आणखी १४ बाधित रुग्ण आढळून आले.
फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( हिंगणगाव ) येथील ६१ व ३१ वर्षीय युवकाचा आणि २७ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. कºहाड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील २८ आणि २० वर्षीय युवती तसेच ४४ वर्षीय महिलेचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील ३५ वर्षीय महिला व २७ वर्षीय युवकालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. माण तालुक्यातील खोकडे येथील ३४ वर्षीय युवकासह जावळी तालुक्यातील तीनजणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये म्हातेखुर्द येथील ५४ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरुष तसेच केडांबेमधील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील राजापूरी येथील ५ वर्षीय बालिका व ३१ वर्षीय महिलेलाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ८१८ झाली असून, यापैकी ६२४ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर बळींचा आकडा ३९ वर पोहोचला आहे. सध्या १५५ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.