सागर गुजर
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षचिन्हावर लढण्याचे रणशिंग फुंकून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाजूला झाले. भाजपच्या वतीने ही निवडणूक पूर्णपणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या ताब्यात घेतली अन् पक्षाला अपेक्षित असेच यश मिळविल्याचे चित्र आहे. आता बँकेच्या अध्यक्षपदाला गवसणी घालता येईल, इतके संख्याबळ शिवेंद्रसिंहराजेंकडे म्हणजेच पर्यायाने भाजपकडे आहे. साहजिकच राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अध्यक्षपदावरून संख्याबळाचे राजकारण जुंपणार आहे.
बारामतीकरांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीआधीच आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र, आ. शिंदे हेच पराभूत झाल्याने त्यांचे नाव बाजूला पडले. आता सलग तीन टर्म संचालकपदी असलेल्या नितीन पाटील यांचे नाव राष्ट्रवादीतून अध्यक्षपदासाठी सर्वांत आघाडीवर आहे, तर दुसऱ्या बाजूला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच पुन्हा अध्यक्षपद हाती घ्यावे, यासाठी भाजपमधून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.
जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ जरी १२ दिसत असले तरी अध्यक्षपदासाठी जर निवडणूकच झाली, तर हे संख्याबळ ऐनवेळी खाली घसरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, असा अध्यक्षपदाचा तिढा निर्माण झाला, तर अवघड होऊन बसणार आहे. तसे झाले तर राष्ट्रवादीची मतेही शिवेंद्रसिंहराजेंना मिळू शकतात. सध्या तरी राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम राहणारी १० मते आहेत, तर भाजपकडे ८ मते आहेत. दोन मते काठावर असल्याने ऐननिवडणुकीत त्यांचा अंदाज येऊ शकतो. विरोधकांची ३ मतेदेखील महत्त्वाची ठरू शकतात.
भविष्यामध्ये नितीन पाटील विरुद्ध शिवेंद्रसिंहराजे भोसले, असा गट पडू शकतो, तसेच ही फट अधिक रुंद व्हावी, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते घाव घालू शकतात. बँकेच्या राजकारणात भाजपने कोणताही कांगावा न करता प्रवेश केला आहे. हा प्रवेश राष्ट्रवादीच्या सहमतीनेच झालाय. आता हीच सहमती राष्ट्रवादीच्या अंगलट येऊ शकते, असे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.
बारामतीच्या लखोट्याचे महत्त्व कमी
जिल्हा बँक असो वा कुठलीही निवडणूक राष्ट्रवादी सुप्रिमो खासदार शरद पवार यांनी पाठविलेल्या लखोट्यानुसारच जिल्ह्यातील नेते निर्णय घेत आले आहेत. राजधानीतील निवडणुकांत कोणाला उमेदवारी द्यायची, त्यांची नावे बारामतीत ठरतात. जिल्हा बँक, जिल्हा परिषद यांचे अध्यक्षपददेखील बारामतीकरांचा हात डोक्यावर असल्याशिवाय कोणालाच मिळू शकत नाही, हे वास्तव आहे. मात्र, बारामतीकरांच्या याच अधिकाराला बँक अध्यक्ष निवडीमध्ये धक्का लागू शकतो.
राष्ट्रवादीने आधीच करून घेतलेय नुकसान
राष्ट्रवादीचे चार मोहरे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कामाला आले असल्याने बँकेतील राष्ट्रवादीचे संख्याबळ आधीच कमी झाले आहे. माण, खटाव, कोरेगाव आणि जावली तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यात विरोधक यशस्वी ठरले आहेत. आता बँकेचे अध्यक्षपदही हातातून गेले, तर त्याचा परिणाम भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीला सोसावा लागू शकतो.