सातारा : बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस प्रमुख करंडकासह ४ सर्वोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक, सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट कोविड रिलीफ पॅकेज व सर्वोत्कृष्ट ऑडिट इनिशिएटिव्ह असे चार पुरस्कारांचे वितरण गोवा राज्याचे सहकारमंत्री चोखा राम गर्ग यांच्या हस्ते व ज्युरी डॉ. एम. रामानुनी व प्रमोद कर्नाड आणि बँकिंग फ्रंटिअर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबू नायर, संपादक मनोज अग्रवाल व भरत सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक दत्तानाना ढमाळ, शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी पुरस्कारांचा स्वीकार केला.
बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, बँकेने सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल नाबार्डचे सलग सहा व इतर संस्थांचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. बँकेचा नावलौकिक सबंध देशात झालेला आहे.
उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतिपथावर पोहोचली आहे.