दीपक शिंदेसातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज रविवारी मतदान होत आहे. आपल्यालाच मतदान करावे यासाठी काही नेत्यांनी मतदारांची पळवापळवी केली. ( मर्जीने गेलेल्यांना पळवून नेले म्हणायचे का हा देखील प्रश्न आहे ) पंधरा दिवस सरबराई केली. याबाबत कोणीच हू की चू केले नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेलाही काही देणे-घेणे राहिले नाही. सर्व दिसत असताना कुठे काय असे म्हणत तेरी भी चूप मेरी भी...असा व्यवहार झाला. लोकशाहीला काळिमा फासणारे हे सहकाराचे पुजारी एवढ्या वर्षात नेत्यांचे होऊ शकले नाहीत. ते दुसऱ्यांचे कसे होतील. जिल्हा बँकेसाठी उमेदवार निवडून देणाऱ्या या महाभागांना सन्मानाने मतदान करता येईल? मतदानावेळी चेहऱ्यावर हास्य असले तरी मान शरमेने नक्कीच खाली जाईल.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहकारातील एक अग्रगण्य बँक आहे. चांगल्या लोकांनी सहकारात यावे यासाठी आग्रही असलेल्या नेत्यांची चांगले कोण आणि वाईट कोण याबाबतच फसगत झाल्याचे दिसते. आपले बँकेतील स्थान मजबूत राहिले पाहिजे यासाठी धडपडणाऱ्या या नेत्यांनी बँकेच्या निवडणुकीत अनेकांचा बळी दिला. आपले आपले म्हणून केसाने गळा कापण्याचे कामही केले. एवढे दिवस सोबत असणाऱ्यांना एकदम बाजूला पडल्याची जाणीव झाली. शेवटी आपल्याला एकाकी लढायचे आहे असा निश्चय करून मैदानात उतरलेल्या या नेत्यांच्या पदरात आज काय पडते हे नियतीलाच ठावूक. पण, जे काही होते ते चांगल्यासाठी होते, असे समजून काम करणाऱ्याला आता संधी नाही मिळाली तरी भविष्यात अनेक संधी दार ठाठावत येतील एवढे मात्र नक्की.
जिल्हा बँकेत तसे म्हटले तर उदयसिंह पाटील यांना एकाकी पाडण्यात आले. ज्या विलासराव पाटील यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यांचा वारसदार एकाकी पडला ही काही जिल्हा बँकेतील नेत्यांना शोभेशी बाब नव्हती. पण, पालकमंत्र्यांना डावलता येत नव्हते. पालकमंत्र्यांनी तरी शांत का बसायचे. एवढे दिवस सत्ता नसताना त्यांनी प्रयत्न करून पाहिले. त्यांना संधी मिळाली नाही. आता सत्ता आहे तर संधी मिळाली पाहिजे, ही त्यांची भूमिका कोणीही नाकारू शकत नाही. तशीच भूमिका आत्तापर्यंत ज्यांनी बँक चांगल्याप्रकारे चालविली त्यांच्या वारसदारांनाही देता आली असती. नवीन नेतृत्व कसे काम करते याचाही अंदाज घेता आला असता. पण, सध्या सत्तेत असणारांना पुन्हा संधी कशी मिळेल अशी खात्री नसल्यानेच त्यांनीही डाव साधला. शेवटी ज्याच्या हाती ससा..तोच पारधी.
कऱ्हाडप्रमाणेच खटाव, माण आणि जावळी, पाटण तालुक्यातही नेत्यांना झुंजावे लागत आहे. प्रत्येकजण अस्तित्वासाठी लढणार यात शंकाच नाही. पण, लोकशाहीची नितीमूल्ये पायदळी तुडवून त्याच्याच आधारावर उभे राहणाऱ्यांनी सहकारात आम्ही कसे चांगले असा टेंभा मिरविण्याची आवश्यकता नाही. आपल्या पायाखाली काय आहे याची जाणीव त्यांनीही ठेवली पाहिजे. राजकारणात सर्वकाही माफ असले तरी नितीमत्ता हरवली की त्या जिंकण्या आणि हरण्याला काहीच अर्थ राहत नाही. मतदारांना कायमस्वरूपी कोणीही गृहीत धरू शकत नाही. ज्या सोसायट्यांनी आपल्या अध्यक्षांवर विश्वास ठेवला तो अध्यक्षही सोसायटीचा राहिलेला नाही. म्हणूनच जे स्वत:च्या सोसायटीचे आणि सभासदांचे होऊ शकत नाहीत ते इतरांचे कसे होणार.
अनेकांचे दर ठरले...तडजोडी झाल्या
जिल्हा बँकेच्या राजकारणाच्या निमित्ताने अनेक घडामोडी मागील काही दिवसांत घडल्या. मतदारांना आपल्यासोबत घेण्यासाठी वाटेल ते करण्याचा प्रकार उमेदवारांकडून झाला. मात्र, याबाबत कोणीही तक्रार केली नाही. आपलेही पाय त्याच मातीचे आहेत हे जाणून कोणीही पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे अनेकांनी दर ठरविले आणि तडजोडीही केल्या. सर्वसामान्यांची बँक म्हणताना एवढ्या तडजोडी सर्वसामान्यांसाठी होत असतील तर बँक नक्कीच आपला लौकिक साता सुमद्रापार नेल्याशिवाय राहणार नाही.
सभासद आणि अध्यक्षांमध्ये निर्माण झाली फारकत
सोसायटीचे सभासद एका बाजूला आणि मतदानाचा अधिकार दिलेला अध्यक्ष एका बाजूला अशी अनेक ठिकाणी अवस्था झाली आहे. ज्याला मतदानाचा अधिकार दिला तो आता सभासदांचे ऐकतच नाही. देश फिरून आलेला हा अध्यक्ष आता सुसाट आहे. पण, दोन दिवसानंतर पुन्हा जमिनीवर यावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या सभासदांचे हित कशात आहे याची जाण त्यांनी ठेवली पाहिजे.
राष्ट्रावादी काँग्रेसची जीत भी और हार भी
- जिल्हा बँकेत सर्वसमावेश आघाडी असेल असे सांगत शिवसेना आणि काँग्रेसला बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने आपलाच हेका चालवायचा प्रयत्न केला. पण, आपल्याच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. पॅनलमधील उमेदवार निवडून येतील का याबाबतही त्यांना ठामपणे सांगता येत नाही.- जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची अशी अवस्था झाल्याने त्यांनी आता जिल्ह्यावर आमचे नेतृत्व आहे असे सांगण्याचा प्रयत्न करू नये. राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आपल्याच नेत्याचे ऐकत नसतील तर पक्षाची जीत आणि हार याला तेच जबाबदार असणार आहेत. म्हणतात ना कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ..तशी राष्ट्रवादीची स्थिती झाली आहे.