सातारा : पालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांच्या सोडतीच्या टोल्याने तब्बल १५ प्रभागांतील दलित नेतृत्वाला चांगलाच दणका दिला आहे. या प्रभागांमध्ये दलितांचे नेतृत्वच नसल्याने साहजिकच इथली दलित वस्ती वाऱ्यावर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने ३० जूनच्या अंकात अचूक अंदाज व्यक्त केला होता. काही मातब्बर मंडळी ‘सेफ’ झाले; परंतु प्रभाग क्रमांक १, २, ३, ४ व ७ या प्रभागांमध्येच केवळ अनुसूचित जातीच्या नगरसेवकांना संधी मिळणार आहे. या परिस्थितीत पूर्वेकडच्या मातब्बर मंडळींचे भविष्य टांगणीला लागले आहे. लोकसंख्येच्या निकषावर झालेल्या आरक्षण सोडतीने काही मंडळींना पालिकेत पुन्हा संधी मिळण्याची वाट मोकळी झाली आहे. पालिका निवडणुकीसाठी २० प्रभाग असणार आहेत. या प्रत्येक प्रभागाचे नेतृत्व दोन नगरसेवक करणार असून, पालिकेत आता ४० लोकनियुक्त नगरसेवक असणार आहेत. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा निकष लावून प्रभाग क्रमांक १, २, ३, ४ व ७ हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. उर्वरित प्रभाग ५, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २० या प्रभागांमध्येही काही प्रमाणात दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. दलित वस्तीला नेतृत्वच नसल्याने येथील विकासकामांना खीळ बसण्याची भीती आहे. प्रभाग क्रमांक १, २, ३, ४ व ७ यांचे नेतृत्व करणारी मंडळी आपल्या प्रभागांतील दलित वस्ती विकासासाठी आग्रही राहून शहराच्या इतर भागावर अन्याय होण्याची शक्यता आहे. दलित नेतृत्वाला शहराच्या सर्वच भागांतून समान संधी दिली गेली असती तर हा अन्याय टळला असता. सध्याच्या आरक्षण सोडतीमुळे सातारा शहराचा बोगदा, चिमणपुरा पेठ, बुधवार पेठ, केसरकर पेठ, तोफखाना परिसर या भागांतील लोकवस्तीवर अन्याय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वमूमीवर तक्रारी होण्याची शक्यता जास्त आहे. (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्षांची विकेट! नगरविकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची संधी मिळालेल्या सचिन सारस यांची आरक्षण सोडतीने विकेट घेतली आहे. त्यांच्या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षणच पडले नसल्याने त्यांना पुन्हा पालिकेत संधी मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. मंगळवार पेठ परिसरातील दलित वस्तीलाही नेतृत्वाची कमतरता जाणवणार आहे.
पराधीन जाहले सातारी नगरसेवक
By admin | Published: July 02, 2016 11:59 PM