सातारा,दि. ११ : थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या बारामती परिमंडलातील ६ हजार ११७ ग्राहकांचा २ कोटी २६ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात सातारा जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची धडक मोहीम तीव्र झाली असून, गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.
वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार बारामती परिमंडलातील बारामती, सातारा व सोलापूर या तिन्ही मंडलांत थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र झाली आहे. यात वारंवार आवाहन करूनही थकित वीजबिल न भरणाऱ्या ६ हजार ११७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांत खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे २ कोटी २६ लाख रुपये थकित आहेत.
लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईत (कंसात थकबाकी) बारामती मंडल- १ हजार ३३२ (९३ लाख), सातारा मंडल- १ हजार ६८७ (४१ लाख), तर सोलापूर मंडलात ३ हजार ०९८ ग्राहकांचा (९२ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची थकबाकीदारांनी कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकित देयकांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.
वीजबिलांबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. थकित वीजबिलांचा भरणा भरण्यासाठी स्थानिक वीजबिल भरणा केंद्र्रांसह व घरबसल्या आॅनलाईन पेमेंटसाठी महावितरणची ही वेबसाईट तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.भरणा केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरूथकबाकी व चालू वीजबिलांचा ग्राहकांना भरणा करता यावा म्हणून महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि. ११ व १२ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकित देयकांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी शनिवारी (दि. ११) व रविवारी (दि. १२) सार्वजनिक सुटी असली तरी जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.