सातारा , दि. २८ : निवडून आलेले आमदार काय करतात? , असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीवरुन करताच पाटणचे आमदार शंभूराज देसाई आक्रमक झाले. पाटणच्या विकास कामांविषयी मला कोणीही शिकविण्याची गरज नाही. अठरा हजार मतांनी मी निवडून आलोय, अशा शब्दात शंभूराज यांनी शाब्दिक प्रतिहल्ला करताच दोन्ही आमदारांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत खडाजंगी सुरू झाली.
जिल्हा नियोजन विकास समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच साताऱ्यात शनिवारी सभा सुरू झाली. या सभेला दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सभा सुरू झाल्यानंतर आमदार नरेंद्र पाटील यांनी महिंद धरणाच्या गळतीचा मुद्दा उपस्थित केला. त्या धरणाजवळ माझे गाव आहे, त्यामुळे मला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही का? असा सवाल पाटील यांनी केला. या विषयावर दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी सुरू असताना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शांत रहा.. शांत रहा.. तुम्हाला बोलायची संधी देतोय, म्हणून सभेचे पावित्र्य नष्ट करू नका, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही आमदारांना वाद न घालण्याची सूचना केली.
दरम्यान, या चर्चेवेळी वांग-मराठवाडी पुनर्वसनाचा विषय आमदार शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला. त्यावेळी पालकमंत्री शिवतारे यांनी धरणग्रस्त चळवळीचे नेते भारत पाटणकर यांच्याशी या पुनर्वसनाबाबत सविस्तर बैठक झाली असल्याचे स्पष्ट केले. पुनर्वसनाचा मुद्दा समोर आल्यामुळे धरणाच्या सांडव्यातून वाया जाणाऱ्या पाण्याचा मुद्दा बाजूला पडला. यानंतर या सभेत इतर विषयांवर चर्चा सुरू झाली.
या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी वारंवार गैरहजर राहतात, त्यामुळे साताऱ्याच्या विभाग नियंत्रकांना नोटीस काढण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.