सातारा : जिल्ह्याची विदारक स्थिती दरवर्षीच पावसाळ्यात दिसते. आताही पश्चिम भागात धो-धो पाऊस असून महाबळेश्वरच्या पर्जन्यमानाने चार हजारचा टप्पा पार केला आहे. तर पूर्वेकडील माण तालुक्यात फक्त ११४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडे दरडी कोसळत असताना पूर्वेकडील ५४ गावे आणि २७९ वाड्यांची तहान टँकरवर अवलंबून आहेत. एकाच जिल्ह्यात शंभर किलोमीटरच्या आतील हा मोठा विरोधाभास सध्या सातारा जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे.सातारा जिल्ह्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक पूर्व आणि दुसरा पश्चिम. पूर्वेकडे दुष्काळी भाग असून माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांचा समावेश होतो. तर पश्चिमेकडील जावळी, पाटण, महाबळेश्वर या तालुक्यात धुवाधार पाऊस असतो. अतिवृष्टीत तर जनजीवन विस्कळीत होते. पश्चिमेकडील नवजा, कोयनानगर आणि महाबळेश्वर येथील पावसाची दैनंदिन नोंद होते. त्यानुसार या भागात दरवर्षीच पाच हजार मिलिमीटरच्यावर पर्जन्यमान होते. त्या तुलनेत पूर्वेकडील माण, खटाव, फलटण तालुक्यांची वार्षिक एकूण सरासरी ४०० ते ५०० मिलिमीटर एवढीच आहे. यावर्षीचा विचार करता आतापर्यंत पश्चिम भागातील नवजा, कोयना आणि महाबळेश्वरला मागीलवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. नवजाला ४,३१६ तर महाबळेश्वरला ४,०२१ मिलिमीटर पावसाची नाेंद झालेली आहे.माण, खटाव, फलटण तालुके दुष्काळी. याठिकाणी पाऊस कमीच पडतो. परतीचा पाऊस हाच काय तो या तालुक्यांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न ठरवणारा. सध्या या तालुक्यात टँकर धुरळा उडवत लोकांना पाण्याचा पुरवठा करू लागले आहेत. माणमध्ये तर विदारक स्थिती आहे. तालुक्यात एकूण १०५ गावे असताना त्यातील ४२ गावे आणि २६३ वाड्यांच्या घशाला कोरड पडलीय. टंचाईग्रस्त लोकांची संख्या ५९ हजार असून २९ हजार पशुधनालाही टँकरच्याच पाण्याचा आधार आहे. त्यातही पाणी वेळेवर मिळत नसल्याने लोकांना विकतचे घेण्याची वेळ आली आहे. काही गावांना तर चार-चार दिवस पाणी येत नाही अशी स्थिती आहे. माणप्रमाणेच खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यात टँकर सुरू असलेतरी टंचाई कमी आहे.
महाबळेश्वर आणि माणची रचना अशी महाबळेश्वर (शहर) - माणसमुद्रसपाटीपासूनची - उंची १३७३ मीटर - ७३० मीटरगतवर्षीचा पाऊस - ३१५७ मि. मी - २१७ मि.मी.आत्ताचा पाऊस - ४२२१ मि.मी. - ११४. मि.मी.