नितीन काळेल ।सातारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागामध्ये पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कºहाडमधील बनवडीने यश मिळविले. या दोन गावांमुळे स्वच्छतेत जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे. तर संगणक असतानाही नाही म्हणणे एका अधिका-याला भोवले. परिणामी त्यांना नोटीस बजावत यापुढे खोटे बोलणाºयाला शिक्षा देण्याचा इशाराच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच अनुसूचित जमाती भरतीचे गुण जाहीर झाले असून, लवकर निवड यादी लागणार आहे.
मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही चांगल्या होत्या. तर काहीमुळे कारवाई करावी लागली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील मान्याचीवाडीने विभागात द्वितीय तर बनवडीने चतुर्थ क्रमांक विभागून मिळविला आहे. या दोन्ही गावांमुळे जिल्ह्याचा नावलौकिक आणखी वाढला आहे. तर मान्याचीवाडी गावाची आता स्वच्छ ग्राम स्पर्धेंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संगणक चालू असतानाही अधिका-यांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी शाखा अभियंता महेश टिकोळे यांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी खुलासा नोटीस पाठवली होती. तसेच दोन दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास वर्षासाठी वेतनवाढ थांबवली जाईल, असेही स्पष्ट केलेले. त्यामुळे यापुढे कोणी खोटी माहिती देईल त्यांच्यावर कारवाई नक्कीच होणार, हेच यामधून दिसून आले.
जिल्हा परिषदेअंतर्गत अनुसूचित जमाती भरती परीक्षेतील उमेदवारांची गुण यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार ५७० जणांचा समावेश आहे. तर २३ जागांसाठी लवकरच निवड यादीही जाहीर करण्यात येऊन संबंधितांना नियुक्ती मिळणार आहे.