सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडींना उद्या, शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. तर पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील दरड प्रवण गावातील सुमारे ७०० ते ८०० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येत आहे. जिल्ह्यात पाठीमागील पाच दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तसेच शुक्रवारीही जिल्ह्याला रेड अलर्ट आहे. यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांना शुक्रवार, दि. २६ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.कण्हेरमधून पाणी सोडले; नदीकाठी सतर्कतेचा इशारा..सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. आज, गुरूवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उचलून ५ हजार क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, उद्या शाळांना सुट्टी; पाटण जावळी आणि महाबळेश्वरमधील ७०० कुटुंबे स्थलांतरित
By नितीन काळेल | Published: July 25, 2024 3:29 PM