प्रमोद सुकरेकराड : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचीनिवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होत आहे. शिक्षक संघटनांच्या नव्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. कराड -पाटण गटात तिरंगी लढत होत असल्याने ती रंगतदार होत असून येथे बंडखोरीचा फटका बसणार की कोणाला झटका बसणार? याबाबतच्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत.मुळताच कराड तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच कराड- पाटण गटात बँकेसाठी सर्वाधिक ११०० वर मतदान आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कराड पाटणच्या मतदारांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा या तालुक्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे निश्चित!या निवडणुकीत सत्ताधारी माजी आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील समर्थक शिक्षक संघाने शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली सभासद विकास पॅनेल उभे केले आहे. तर शिक्षक संघाचे दुसरे नेते संभाजीराव थोरात यांच्या गटाने शिक्षक समितीला मदतीचा हात देत विरोधात सभासद परिवर्तन पॅनेल रिंगणात उतरवले आहे. शिवाय काही ठिकाणी तिसऱ्या स्वाभिमानी आघाडीचे उमेदवारही रिंगणात आहेत.कराड पाटण गटात शिक्षक संघाच्या पुस्तके गटाचे महेंद्र जानुगडे उमेदवार आहेत. तर विरोधात शिक्षक संघ थोरात गट व समितीचे संजय नांगरे हे रिंगणात आहेत. शिवाय संभाजीराव थोरात यांचे समर्थक असणाऱ्या नितीन नलवडे यांनी बंडखोरी केल्याने या बंडखोरीचा कोणाला फटका बसणार की बंडखोर झटका देणार? अशीही चर्चा सुरू झाली आहे.
होम पिचवरच धक्काशिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात हे मूळचे कराड तालुक्यातील आहेत. त्यांनी या निवडणुकीत समिती बरोबर युती करून लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वाटाघाटीत या गटातील उमेदवारी शिक्षक समितीला गेली. पण त्यांचे कार्यकर्ते असणाऱ्या नितीन नलवडे यांनी बंडखोरी केल्याने थोरात यांना होमपिचवरच धक्का बसल्याचे बोलले जात आहे.आजवर समितीचेच वर्चस्वकराड- पाटण तालुक्यात प्रथमदर्शनी शिक्षक संघाचे प्राबल्य दिसते. शिक्षक सोसायटी निवडणुकीत अपवाद वगळता ते दिसूनही येते. मात्र शिक्षक बँकेच्या निवडणुकीत अपवाद वगळता आजवर समितीचाच उमेदवार विजयी झाला आहे. आता त्यांना नेमकी कोणाची मदत होत राहते? हा संशोधनाचा भाग आहे. पण तीच परंपरा समिती या निवडणुकीत कायम ठेवणार का? हे पहावे लागेल.म्हणे आम्ही त्यांचेच ..बंडखोरी केलेले उमेदवार नितीन नलवडे हे आम्ही शिक्षक संघाच्या थोरात गटाचेच आहोत .मात्र आधी उमेदवारी संघाने निश्चित केली व नंतर ती समितीला दिली त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मला माघार घेता आली नाही. मात्र आम्ही शिक्षक संघाच्या थोरात गटाचेच असल्याचे नलवडे मतदारांना सांगताना दिसतात.असे आहे मतदानकराड पाटण- गटात ११५७ शिक्षकांचे मतदान आहे. पैकी ६७९ मतदान कराड तालुक्यातील तर पाटण तालुक्यात ४७८ मतदान आहे. रिंगणात उभे असणाऱ्या तीन उमेदवारांपैकी महेंद्र जानुगडे व नितीन नलवडे हे दोन उमेदवार मुळचे पाटण तालुक्यातील आहेत. संजय नांगरे हे मूळचे कराड तालुक्यातील आहेत.सेवानिवृत्तांची मते २०० वरकराड पाटण गटात सेवानिवृत्त झालेल्या २०० वर प्राथमिक शिक्षकांची मते आहेत. ही मते या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार असे मानले जाते.म्हणे सत्ता महत्त्वाची नाहीसत्तेपेक्षा संघटना महत्वाची असते. त्यामुळे शिक्षक बँक निवडणुकीत शिक्षक संघ एकसंघ करण्याची संधी चालून आली होती. मात्र निवडणुकीनंतर संघटनेशी संबंध नसणाऱ्या लोकांमुळे ती वाया गेली आहे .पण आता कराड- पाटण सोसायटी निवडणुकीत तरी नेत्यांनी एकसंघ होण्याबाबत विचार करावा अशा भावना शिक्षक संघाचे सामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत