सातारा : जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असलेल्या जनतेला आता डेंग्यूनं छळलंय. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत नसतानाच जनतेसमोर डेंग्यूच्या रुपानं दुसर संकट उभं ठाकलंय. यामुळे प्रशासन अक्षरश: गोंधळून गेलंय. जिल्ह्यात आत्तापर्यंत डेग्यूंचे ९२ तर चिकुनगुनियाचे ३२ रुग्ण आढळून आलेत.
सारं प्रशासन कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी एकवटलं असतानाच आता डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांनी डोकं वर काढलंय. जानेवारीपासून डेंग्यूचे रुग्ण वाढू लागलेत. सध्या सातारा, कऱ्हाड आणि फलटण या तीन तालुक्यांत डेंग्यूची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाच्या भाषेत याला उद्रेक म्हणतात. हा उद्रेक विशेषत: कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे हा आजार साथरोग असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
चौकट:
चिकुनगुनियाची लागण झालेली गावे
कऱ्हाड तालुक्यात चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये वाठारमध्ये २० रुग्ण तर सुपने मुंढे येथे ३ आणि कोळेवाडी येथे ६ रुग्ण आढळले आहेत.
चौकट :
काय काळजी घ्यायला हवी
घराशेजारील डबकी तत्काळ बुजविणे, घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवा, झाकण नसल्यास कापड बांधा. घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे-खिडक्यांना जाळी बसवा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. कोणताही ताप अंगावर काढू नका, ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या.
..........
चौकट
पालिकेचे पथक तैनात
सातारा शहर व परिसरात डेंग्यू, चिकुनगुनियासह साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी सातारा पालिकेने दहा कर्मचाऱ्यांच्या एका पथकाची नेमणूक केली आहे. ज्याठिकाणी डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येतील, त्या परिसरात हिवताप विभागाच्या सहकार्याने सर्वेक्षण करणे, डास अळ्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करणे, धूरफवारणी, अॅबेटिंग अशी कामे या पथकामार्फत केली जातात.