लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी १३ जुलै रोजी लोणंदला येत आहे. वारकऱ्यांच्या सेवेत कोठेही त्रुटी राहू नयेत म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी लोणंद येथील पालखी तळ, पालखी मार्ग, दत्तघाट व नीरा स्नान, लोणंद नगरपंचायत पाडेगाव जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.यावेळी तहसीलदार विवेक जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप लांडे, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, रवींद्र क्षीरसागर, विश्वास शिरतोडे, दशरथ जाधव उपस्थित होते.सिंघल म्हणाल्या, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा लोणंदला यंदा एक दिवसाचा मुक्काम आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढणार आहे. लोणंद पालखीतळ माऊलीच्या मुक्कामासाठी कमी पडत आहे. पालखी सोहळा व भाविकांची लोणंद मुक्कामी कसलीही गैरसोय होणार नाही, अशाप्रकारे पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी करा.
पालखीतळावर जागेअभावी भाविक व वारकऱ्यांची कसलीच गैरसोय होणार नाही, असे नियोजन करावे. पालखी तळ ते नीरा दत्त घाटापर्यंतच्या रस्त्याच्या भोवताली वाढलेली झाडेझुडपे काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा.
नीरा दत्तघाट येथे संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुकांना पवित्र नीरा स्नान घातले जाते, या जागेची चांगली स्वच्छता व साफसफाई करण्यात यावी. चांदोबाचा लिबं येथे १४ जुलै रोजी पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिगंण होणार आहे. लोणंद-फलटण रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.वाढीव निधीची मागणीपाडेगाव येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी नीरा दत्तघाट व पाडेगाव ग्रामपंचायतीला पालखी सोहळ्यादरम्यान निधी कमी पडत असून, त्या निधीत कामे करण्यास अडचणी येत आहेत. तो निधी वाढवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली.