महाबळेश्वर : महाबळेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. नंदकिशोर भांगडीयांच्या विरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या समर्थनार्थ महाबळेश्वर बंद केले आहे.महाबळेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. भांगडीया यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार नोंद झाली आहे. या तक्रारीचा नागरिकांनी निषेध केला. तसेच डॉक्टरांच्या समर्थनार्थ नागरिकांनी ठिकठिकाणी तथाकथित आरोपाच्या निषेधाचे फलक लावले आहेत.
प्रतिष्ठित डॉ. भांगडीया यांच्या विरोधात प्लॅन करून पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा कट केला आहे. त्याचा निषेध म्हणून संपूर्ण बाजारपेठ बंद करीत आहोत, असा फलकांवर मजकूर आहे.या घटनेतून नामवंत डॉक्टरांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टरांचे वैद्यकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान सर्व महाबळेश्वरकरांना माहीतच असून खंडणीसाठी नव्याने सुरु झालेला हा उद्योग आहे. त्यामुळे चौकशीअंती सर्व सत्य समाजाला कळेलच.
आम्ही सर्व महाबळेश्वरवासीय डॉ. भांगडीया कुटुंबीयांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. या कटाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, अशा आशयाचेही फलक लावण्यात आले आहेत.डॉ. भांगडीयांवर दाखल झालेल्या तक्रारीचा निषेध म्हणून महाबळेश्वरकरांनी कडकडीत बंद पाळला आहे. या बंदला प्रतिसाद मिळत असून मुख्य बाजारपेठ बंद आहे.