कऱ्हाड (सातारा) : चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वारंवार खुन्नस दिल्याच्या कारणावरून धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून करण्यात आला.
कऱ्हाड तालुक्यातील कुसूर येथे ही घटना घडली. उमेश उद्धव मोरे (वय २०) असे खून झालेल्याचे नाव असून, उमेशला मंगळवारी सायंकाळी भोकसण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांनी आरोपी गणेश आनंदराव देशमुख (रा. कुसूर) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसूर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चार महिन्यांपूर्वी झाली आहे. निवडणूक निकालानंतर गावातील उमेश मोरे व गणेश देशमुख या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वेळोवेळी या दोघांत शाब्दिक चकमक उडत होती. काही दिवसांपूर्वी गावच्या यात्रेतही दोघांमध्ये वाद झाला होता.दरम्यान, मंगळवारी सायंकाळी गणेश देशमुख व उमेशचा भाऊ सुशांत यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद निदर्शनास येताच उमेश त्या ठिकाणी गेला. त्यावेळी गणेशने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने उमेशवर वार केला. तसेच उमेशच्या छातीत व पोटात भोकसले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.
नातेवाईक व परिसरातील ग्रामस्थांनी त्याला उपचारार्थ कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी गणेश देशमुखला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भापकर तपास करीत आहेत.