सातारा : सातारा तालुक्यातील निगडी-धनगरवाडी येथे राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाने विहिरीत बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. शंकर संतोष वाघमोडे असे त्या मुलाचे नाव असून, त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी-धनगरवाडी येथे राहणाऱ्या गंगुबाई हणमंत कोरे (वय ४०) या गावातील एका विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.
विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत कोसळल्या. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावातीलच शंकर वाघमोडे या मुलाने कोणताही विचार न करता थेट विहिरीत उडी घेतली आणि बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले.शंकर हा वयाने लहान असला तरी तो पोहण्यात निपूण आहे. त्याची घरची परिस्थिती जेमतेम असून, वडील शेती करतात. त्याने दाखविलेल्या या धाडसाचे गावकऱ्यांमधून कौतुक होत आहे.
भाजपचे महेश शिंदे यांनी शंकरच्या धाडसाचे कौतुक करण्याबरोबरच महेशदादा शिंदे युथ फाउंडेशनच्या वतीने त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तसेच शौर्य पदकासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कुमार भोईटे, गोजेगावचे उपसरपंच कृष्णात घोरपडे, राजू रणखांबे, बळी वाघमोडे, संतोष वाघमोडेयांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.