सातारा : साहित्य रत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून कापड दुकानासाठी कर्ज मिळण्यासाठी तयारी केलेली फाईल दोनदा गायब झाल्याचा गंभीर आरोप लाभार्थी मातंग सेनेचे उपाध्यक्ष रमेश आवळे यांनी केला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून या प्रकरणासह इतर मागण्यांसाठी मातंग सेना १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या महामंडळातून तळागाळातील मातंग समाजाच्या लाभार्थींना कर्ज मिळत नाही. गाई खरेदी, शेळ्या मेंढ्या पालन अशी अनेक प्रकरणे आहेत, मात्र बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
महामंडळाचे कार्यालय प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात यावे. या महामंडळास जिल्हा व्यवस्थापक शासनाने नियुक्त करावा, कर्ज प्रकरण फाईल गायब झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान, महामंडळातून फाईल्स गायब झाल्याच्या आरोपाचे खंडण या महामंडळाचे व्यवस्थापक यु. बी. राक्षे यांनी केले आहे. कर्ज प्रकरणाच्या फाईल्स तपासून त्या संबंधित बँकांकडे पाठविल्या जातात. कर्ज प्रकरण मंजूर करायचे की नाही? याचे सर्वतोपरी अधिकार हे त्या बँकांना असतात, असे स्पष्टीकरण राक्षे यांनी लोकमतशी बोलताना केले.
महामंडळाकडे आलेल्या कर्ज मागणी अर्जाची व कागदपत्रांची योग्य ती छानणी करुन ती बँकेकडे सादर केली जाते. मात्र बँकांतून जर कर्ज प्रकरणास दिरंगाई झाली अथवा ते प्रकरण मंजूर झाले नाही. या प्रकरणातही तसेच झाले असण्याची शक्यता आहे.- यु. बी. राक्षे,जिल्हा व्यवस्थापक, अण्णा भाऊ साठे महामंडळ