मुराद पटेल
शिरवळ : घरातील कर्ता वडीलच गेल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळूनही अशा परिस्थिती धीर खचू न देता त्यांच्या मुलीनी वडीलांची शितोंडी धरण्यापासून ते अंत्यसंस्कार अशा सर्व विधी स्वतः करून पारंपारिक परंपरेला छेद देत या लेकीनी अग्निसंस्कार आणि पिंडदान करून त्यांनी समाजापुढे नवा पायंडा निर्माण केला आहे. धर्माच्या दृष्टीने स्त्रीला शुद्र समजले जाते त्यामुळे तिला आजपर्यंत अशा संस्कारापासून वंचित ठेवले होते. परंतू काळानुसार बदलले पाहिजे असा संदेश सावित्रीच्या जन्मगाव शेजारुनच शिक्षण घेणा-या या दोन बहिणींनी दिला आहे.डोक्यावरचं पितृछत्र हरपलं की भलेभले हतबल होतात; परंतू वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारापासून अस्थी विसर्जन या विधी उरकून दोघीनी जवळ आलेल्या दहावी-बारावीच्यामध्ये परीक्षेला जाण्याचं अतुलनीय धैर्य या सावित्रीच्या लेकीने दाखवलं आहे.कवठे ता.खंडाळा येथील इयत्ता बारावीमध्ये शिकणारी ज्ञानल आणि दहावीत शिकणारी प्रांजल उर्फ मीनल याच त्या सावित्रीच्या लेकी...!
शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या दोघींनी हृदयावर दगड ठेवून दुर्दैवाने अचानक आत्महत्या केलेल्या वडीलांच्या पार्थिवावर सख्खे भाऊ आणि चुलते नसल्याने स्वतः या दोघी पुढे सरसावत अंत्यसंस्कार, दशक्रिया, पिंडदान केले. शिरवळ येथील नीरा नदीत अस्थीविसर्जन करून वैकुंठ स्मशानभूमी येथील सर्व विधी आटोपून दुःख पचवीत आणि घरचे काम सांभाळीत दोघींनी येणा-या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला आहे.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावापासून जवळ असणा-या कवठे येथे ही ह्रदयस्पर्शी घटना घडली आहे. येथील कुमार नारायण वेदपाठक वय ४२ मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकताना त्यांना पत्नी दिप्ती यांनीही शेतमजुरी करून खमकेपणाने साथ दिली...पोटी फक्त दोन मुली... वेदपाठक यांनी कशाचीही कमतरता भासू न देता त्यांना वाढविले... मात्र बेताची परिस्थिती आणि पडीक जमीन यामुळे कर्जाचा डोंगर झाल्याने मानसिक आजाराने कुमार यांनी राहत्या घरात आत्महत्या केली.
परंपरेप्रमाणे जर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे म्हटले असते, तर गोतावळाही मोठा आहे; पण दोन बहिणींनी मिळून आपणच अंत्यसंस्कार आणि इतर विधी करण्याचा निर्णय घेतला आणि तसे केलेही. अर्थात या सर्वांच्या गोतावळा असणा-या नातेवाइकांनी त्यांना मान्यता देत सर्व विधी करण्यासाठी पाठबळ दिले.
सावित्रीच्या लेकींना हवाय मदतीचा हात....!कवठे ता.खंडाळा येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या ज्ञानलला दहावीत ९० टक्के गुण मिळाले होते तर प्रांजल ही दहावीत शिकत आहे. या दोघीही शाळेत हुशार असून त्यांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विभागावर शैक्षणिक क्षेत्रात चमक दाखवली आहे.
या मुलींच्या पुढील शैक्षणिकसाठी समाजाने पुढे येण्याची गरज असून दानशुरांनी त्यांची आई दीप्ती कुमार वेदपाठक शिरवळ मधील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत ६८०२०९१७७६६ खाते नंबरवर आर्थिक मदत करावी जेणेकरून या सावित्रीच्या गावाशेजारीच असलेल्या लेकींची शैक्षणिक परवड होणार नाही.
माझ्यासाठी त्या दोन्हीही मुलेच आहे....! माझ्या पतीचा भाऊ पंचवीस वर्षपासून बेपत्ता आहे. आम्ही दोघांनीही आमच्या मुलीना मुलांच्या सारखी वागणूक दिली आहे. आज माझ्या मुलीनी स्वतः सर्व विधी केले आहे आहे. अशा मुलींचा मला खूप अभिमान आहे. त्या माझ्यासाठी मुलेच आहेह्ण असे सांगताना दीप्ती वेदपाठक यांचे डोळे पाण्याने डबडबले होते.
-दिप्ती वेदपाठक, आई
वंशाचा दिव्यासाठी समाजात चाललेली संकुचित विचारसरणी काळानुसार बदलली पाहिजे. आम्ही दोघी बहिणींचे हे कर्तव्य असल्याने वडीलांचे अग्निसंस्कार सर्व विधी केले आहे. इतर युवतींनी सुद्धा न डगमगता अशा संस्कारासाठी पुढे येण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
-ज्ञानल वेदपाठक,मुलगी.
सर्वोतपरी मदत करणार आजच्या आधुनिकतेच्या युगामध्ये मुला-मुलींना समान न्याय देण्याकरीता झटणा-या क्रांतिज्योती साविञीबाई फुले यांच्या लेकींनी समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. कवठे येथील लेकींच्या पुढील जिवनाकरीता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतपरी मदत करणार आहे.
उदय कबुले,जि.प.सदस्य सातारा