वाई (सातारा ) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियान राज्यात शाळास्तरावर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गेल्या वर्षी प्रथमच लेकीसत्ताक प्रजासत्ताक दिन या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. याचे राज्यात कौतूक होत आहे. वाई तालुक्यात शुक्रवारच्या प्रजासत्ताक दिनीही गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचे आवाहन केले जात आहे.शिक्षण विभागाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात स्त्री-पुरूष समानतेचा कृतीने पुरस्कार करणाऱ्या या उपक्रमाची दखल घेतली. शासकीय प्रकाशनाने जीवन शिक्षण या शैक्षणिक नियतकालिकाने या उपक्रमाला राज्यभर प्रसिध्दी दिली.
राज्याच्या विविध जिल्ह्यातून या क्रांतिकारी पावलाचे कौतुक झाले. शिक्षकांपासून ते राज्याच्या शिक्षण आयुक्तांपर्यंत अनेकांनी कौतुक केले. त्या आशयाचे संदेश मिळाले. या लेकीसत्ताक प्रजासत्ताक दिनाने पुन्हा एकदा वाई तालुक्याचा विधायक दृष्टिकोन व शाळांच्या नावोपक्रमशीलतेचा डंका राज्यात वाजविला.यावर्षीही या उपक्रमांची पुनरावृत्ती करावयाची आहे. शाळांमधून फक्त समानताच नव्हे, तर समतेची रुजवणूक होईल, अशा उपक्रमांतून शंभर टक्के मुलींना किमान बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन व प्रेरणेचे बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. सर्व शाळांनी दि. २६ जानेवारी रोजी वाई तालुक्यातील शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करावे, शाळा व्यवस्थापन व विकास समित्यांनी या उपक्रमास पाठबळ द्यावे.
लेक वाचवा, लेक शिकवा अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याची पुरोगामी प्रतिमा अधिक उजळ होणार आहे.- कमलाकांत म्हेत्रेगट शिक्षणाधिकारी