सातारा : जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर फलटणमध्ये दगड व विटा फेकून मारल्याची खळबळजनक घटना घडली. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, फलटण शहर परिसरातील कुंभारटेक वीटभट्टी, मलटल येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी नाना बाळू जाधव याने जमावाला भडकवले. त्यावेळी संतोष जगन्नाथ घाडगे (रा. बिरदेवनगर), किरण विजय घाडगे (रा. जिंतीनाका), जीवन विक्रम घाडगे (तुपारी, ता. पलूस, जि. सांगली), उज्ज्वला युवराज घाडगे (महतपुरापेठ), अंजू संजय वाघमारे (कोथरुड,पुणे), बबिता शिवाजी मोरे, (रा. काले, ता. कऱ्हाड ), कमल रामराव जुवेकर (रा. पनवेल), युवराज जगन्नाथ घाडगे, किरण जगन्नाथ घाडगे, मीना विजय घाडगे, रेश्मा किरण घाडगे, इतर ७ ते ८ जणांनी शिवीगाळ करत हाताने, दगड व विटा फेकून मारल्या.
यात उपनिरीक्षक दळवी, हवालदार काकडे, दडस, सोनवलकर, येळे जखमी झाले. याप्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.